
दापोली तालुक्यातील हर्णे बंदर हे मच्छीमारी व्यवसायासाठी जिल्ह्यातील क्रमांक 2 चे बंदर म्हणून ओळखले जाते. या बंदरात दापोली तालुक्यातील केळशी, आडे,पाजपंढरी, बुरोंडी, दाभोळ या मच्छीमारी गावांतील तब्बल दोन हजार पाचशे नोंदणीकृत नौकांसह रत्नागिरी आणि रायगड जिल्हय़ांतील मच्छीमारी बोटी दररोज हर्णे बंदरात लागत असतात.
मात्र बंदरात लागलेल्या मच्छीमार बोटीतून मारून आणलेली मासळी किनाऱ्य़ावर आणताना जेटीची सुविधा नसल्याने मच्छीमारांची चांगलीच दमछाक होते. ही मच्छीमारांची परवड थांबणार तरी कधी असे येथील सर्व दृश्य पाहिल्यावर आपल्या सहज लक्षात येते.
हर्णे बंदरात दररोज सकाळ, संध्याकाळ मच्छीचा लिलाव होतो. त्यावेळी समुद्रात आतमध्ये साधारपणे 100 मीटर अंतरावर किनाऱ्य़ापासून दूर उभ्या करून ठेवलेल्या बोटीमधील मासळी किनाऱ्य़ावर बैलगाडीतून आणताना तसेच मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्य़ा बोटींमध्ये इंधन,धान्य,पाणी,बर्फ आणि जाळी घेऊन जाताना मोठीच कसरत करावी लागते. यात मच्छीमारांच्या वेळेचा तसेच पैशांचाही अपव्यय होतो.
यासाठी येथील मच्छीमार व्यावसायिक संघटनांनी गेल्या पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून येथे जेटी व्हावी म्हणून प्रयत्न सुरू ठेवले आहेत. यासंबंधातील शासकीय कार्यालय मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयांचे कित्येकदा जेटीच्या मागणीसाठी उंबरठे झिजवले आहेत. पत्रव्यवहाराद्वारे संपर्प साधून जेटीची मागणी करण्यात येत आहे. मात्र आजपर्यंत हर्णेवासीयांनी जेटीच्या केलेल्या मागणीला प्रशासनाकडून केराचीच टोपली दाखविण्यात आली आहे.
लोकसभा तसेच विधासभा निवडणुकांवेळी मते पदरात पाडण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे आश्वासनापलीकडे काहीही करत नाहीत. अनेकदा या बंदराची पाहणी पेंद्र तसेच राज्य सरकारच्या मंत्र्यांनी केली आहे. मात्र जेटी उभारण्याच्या कामास काही मूर्तरूप सापडत नाही. त्यामुळे अजून किती काळ मच्छीमारांनी आशेवर जगावे, हा प्रश्नच असून कोणालाही मच्छीमारांच्या यातनांचे काहीही देणघेणे नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
हर्णे बंदरावर जेटी व्हावी यासाठीची मागणी करणारे अनेक जण काळाच्या पडद्याआड निघून गेले. त्यामुळे आता कोणी जेटीची मागणी पूर्ण करेल आणि कोणावर विश्वास ठेवावा याचा आम्हालाच भरवसा वाटत नाही. त्यामुळे आमच्या मागच्या लोकांनी जसे दिवस काढले तसे आम्हीही काढायचे याची मानसिकता आम्ही तयार केली आहे. – देवचंद पावसे, मच्छीमार व्यावसायिक, हर्णे पाजपंढरी



























































