
शालेय क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेची झलक दाखवणाऱ्या 16 वर्षांखालील हॅरिस शिल्ड प्लेट गटाच्या 2026-27 हंगामात फलंदाज आणि गोलंदाजांनी मैदान गाजवले. आरआर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलने 353 धावांनी मिळवलेला विजय, नॅशनल इंग्लिश स्कूलच्या आयुष वलमची अष्टपैलू चमक आणि सेंट झेवियर्स बॉईज अकादमीच्या फलंदाजांचा धडाका हे दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरले
आरआर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलने प्रथम फलंदाजी करताना 45 षटकांत सात बाद 421 धावांचा डोंगर उभारला. समीक्ष नायर (86), मेध दईया (85) आणि यश सागवेकर (82) यांनी अर्धशतके झळकवली. या आव्हानासमोर सेंट जॉन हायस्कूलचा डाव अवघ्या 68 धावांत आटोपला. वेदांत पाटीलने अवघ्या 10 धावांत सहा विकेट घेत आरआर एज्युकेशनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तसेच विरारच्या नॅशनल इंग्लिश स्कूलने सेंट पीटर्स स्कूलवर सहा विकेट्सनी मात केली. सेंट पीटर्सने 159 धावा केल्या. कवीश मयेकर (46) आणि नारायण मातकर (35) यांनी प्रतिकार केला. आयुष वलमने 52 धावांत पाच विकेट्स घेतल्या.




























































