मतचोरीतूनच महाराष्ट्रात सत्ता; फडणवीस राजीनामा द्या!

मतांची चोरी करूनच भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी तर पुराव्यानिशी ही बाब सिद्ध करून दाखवली असून चंद्रपूर जिह्यातील राजुरा मतदारसंघात 6 हजार 850 मतांची चोरी झाली आहे. गृहमंत्री असलेल्या फडणवीसांच्या पोलिसांनीच याप्रकरणी एफआयआरदेखील दाखल केला. त्यामुळे मतांची चोरी करून सत्तेत बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये आज कोकण विभागातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसंदर्भातदेखील चर्चा करण्यात आली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणाही उघडकीस आणला.

22 सप्टेंबरला काँग्रेस राज्यभर पेढे वाटणार

जीएसटीमधील सुधारणा हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दूरदृष्टी विचाराचा मोठा विजय आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्र 22 सप्टेंबर रोजी राज्यभर दुकानदार, व्यापारी आस्थापने येथे पेढे वाटून साजरा करणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांना सांगितले. जीएसटीमध्ये सुधारणा करा, असे राहुल गांधी यांनी आठ वर्षांपूर्वीच जाहीरपणे सांगितले होते. सरकार उशिराने का होईना जागे झाले आणि जीएसटीमध्ये त्यांना सुधारणा करावी लागली. या सुधारणेबद्दल काँग्रेस राज्यभरात आनंद साजरा करणार असल्याची माहिती सपकाळ यांनी दिली.