विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या – हर्षवर्धन सपकाळ

भाजपाच्या राज्यात मंदिर तोडले जात असताना सरकार मात्र मूग गिळून गप्प बसते ही लाजीरवाणे आहे. मंदिर पाडण्यास एकीकडे न्यायालय स्थगिती देत असताना दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी मंदिर पाडतात, हे शासनाचे अपयश आहे. जैन मंदिर पाडून भाजपा सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जमीनदोस्त केलेल्या विलेपार्लेतील जैन मंदिर परिसराला भेट देऊन जैन बांधवांकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व सीडब्लूसी सदस्य नसीम खान, प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, ब्रिज दत्त, श्रीरंग बर्गे, विश्वजीत हाप्पे, आनंद सिंह, श्रीकृष्ण सांगळे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जैन मंदिरात स्त्री पुरुष आराधना करत असताना तथाकथित महाराज आणून मंदिरातील मूर्ती काढून घेतल्या, यावेळी काही मूर्तींची तोडफोड झाली. राज्यात धार्मिक स्थळांवर कारवाईची शृंखला सुरु असताना जैन मंदिरही यात आले असून सरकार हे जाणीवपूर्वक करत आहे का? असा सवाल करत भाजपा सरकार संस्कृती बुडवायला निघाले आहे, पण मंदिर पाडणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करत आहे असेही सपकाळ म्हणाले. मंदिर पाडले जात असताना जैन बांधवांनी शांतता पाळली. महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसेच्या मार्गाने मंदिराचे सत्य घेऊन पुढे जाऊ असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.