डोअरबेल बंद आहे, कृपया मोदी-मोदी ओरडा; वाचा कुठे व का लागले पोस्टर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणूक रंगात येत असून प्रचाराचा शंखनाद सुरू आहे. जाहीर सभांसह घरोघरी जावून प्रचार करण्याकडेही उमेदवारांचा कल आहे. महाराष्ट्रासह हरयाणामध्येही 21 तारखेला मतदान होणार असल्याने दोन्ही राज्यात रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. उमेदवारांकडून आणि पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवली जात आहेत. याच दरम्यान हरयाणातील अंबाला येथे उमेदवाराला समर्थन देण्यासाठी अनोखे पोस्टर्स लावले आहे. या पोस्टरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंबाला येथील एका मुस्लीम वस्तीमध्ये घरांच्या बाहेर काही फोटो लागले आहेत. या पोस्टवर लिहिण्यात आले आहे की, ‘डोअरबेल खराब आहे, दरवाजा उघडण्यासाठी कृपया मोदी-मोदी असा आवाज द्या.’ अंबालाच्या छावनी भागात असणाऱ्या एका मुस्लीम वस्तीमध्ये लागलेल्या या पोस्टर्सने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

doorbell

घराबाहेर हे पोस्टर्स का लावण्यात आले आहेत यामागील कहानीही रोमांचित आहे. निवडणुकीदरम्यान खूप उमेदवार त्यांच्याकडे मतांची मागणी करण्यासाठी येतात आणि तीन-तीनदा बेल वाजवत बसतात. हे पोस्टर्स त्याच उमेदवारांसाठी आहे, असे या वस्तीतील नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आमचे समर्थन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे जे लोक मोदींच्या नावाचा जयघोष करतील त्यांच्यासाठीच आम्ही दरवाजा उघडू, असेही वस्तीतील लोकांनी सांगितले.

तिहेरी तलाकवर मुस्लीम महिला आनंदी
घराबाहेरील हे अनोखे पोस्टर्स मुस्लीम महिलांनी लावल्याचे सांगण्यात आले आहे. वस्तीतील महिला मोदी सरकारने घेतलेले तिहेरी तलाक बंदीच्या निर्णयामुळे आनंदी आहेत. तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. मात्र सरकारने चांगला निर्णय घेतल्यामुळे आता असे होणार नाही. या मुद्द्यामुळे आमचे मोदींना समर्थन असल्याचे वस्तीतील महिलांनी सांगितले.

doorbell1