विधानसभेसाठी इच्छुकांच्या बैठका, राष्ट्रवादीचा ड्रामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-and-sharad-pawar

उदय जोशी । बीड

आगामी विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी कोण कोण इच्छुक आहेत यासाठी राष्ट्रवादीने मुंबईत जोर बैठका घेतल्या. तशी परिस्थिती सध्या नाही आहे. प्रत्येक मतदार संघात इच्छुकांची भाऊ गर्दी नाही ना, उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग नाही. केज मतदार संघाचा अपवाद वगळता पाच मतदार संघात एक एक सोडले तर दुसरे प्रभावी नेतत्त्व इच्छुक नाही. असे असताना राष्ट्रवादीच्या बैठका कशासाठी हा सवाल उपस्थित होत आहे.

एके काळी बीड जिल्हा हा राष्ट्रवादी चा बालेकिल्ला होता. शरद पवारांनी उमेदवारी दिली की तो निवडून यायचा. अगदी पुलोदच्या प्रायोगातही बीड जिल्हा पवारांच्या पाठीशी उभा होता. सर्वश्रुत असलेल्या मुंडे-पवारांच्या राजकीय संघर्षाच्या काळातही बीड जिल्ह्याने सहा पैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे दिले होते. राष्ट्रवादीची मिळालेली उमेदवारी विजयावर शिक्कामोर्तब करायची. प्रत्येक मतदार संघात प्रस्थापिताची भाऊ गर्दी व्हायची, लॉबिंग केली जायची श्रेष्ठीच्या विश्वासात राहण्यासाठी आणि त्यांची मेहरबानी मिळवण्यासाठी खटाटोप केला जायचा. उमेदवारी मिळवण्यासाठी एका एका मतदार संघात अनेक उमेदवार शक्तिप्रदर्शन करायचे आता चित्र तसे राहिले नाही.

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी केवळ केज मतदार संघात दोन उमेदवार इच्छुक आहेत. केज मधून उमेदवारी मिळवण्यासाठी माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि अक्षय मुंदडा यांच्यात रस्सीखेच आहे. उर्वरित पाच मतदार संघात केवळ एक एक उमेदवार इच्छुक आहेत. दुसरे प्रभावी स्पर्धक कोणी नसल्यामुळे फारशी रस्सीखेच नाही ना स्पर्धा नाही. परळी मधून धनंजय मुंडे, बीड मधून संदीप क्षीरसागर, गेवराई मधून विजयसिंह पंडित, माजलगाव मधून प्रकाश सोळुंके, आष्टी मधून बाळासाहेब अजबे हे पाचच जण पाच मतदार संघातून इच्छुक आहेत आणि त्यांची उमेदवारी निश्चित आहे. मग दुसरे इच्छुक उमेदवार उपलब्ध नसताना राष्ट्रवादीच्या जोर बैठका आणि देखावा कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.रविवारी मुबई मध्ये राष्ट्रवादी ने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या या बैठकांना समर्थकांनी ही गर्दी केली होती.