
राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसेने यंदाचा शिवाजी पार्कवरील भव्य दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘एक्स’च्या माध्यमातून ही माहिती दिली. यंदाच्या दिवाळीत नागरिकांनीही फटाके फोडणे आणि मोठ्या प्रमाणावर रोषणाई करणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मनसेच्या वतीने दरवर्षी शिवाजी पार्कवर भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. आकर्षक रोषणाईने उजळून निघणारा हा दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकर गर्दी करतात. मात्र, यंदा राज्यावर ओढवलेले दुष्काळाचे भीषण संकट पाहता असा जल्लोष करणे आपल्याला योग्य वाटत नाही. ही काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ नसली तरी उत्साहाला आवर घालण्याची गरज आहे. दिवाळी साजरी करू नका, असे माझे म्हणणे नाही. नागरिकांनी कंदील लावावेत, फराळ वाटावा आणि परंपरेनुसार सण साजरा करावा, असेही राज ठाकरे म्हणाले.


























































