
हरयाणा विधानसभा निवडणुकीतील तिकीट वाटपावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. वरिष्ठांकडून जुन्या लोकांना डावलून पक्षात आलेल्या नव्या लोकांना उमेदवारी दिली जात आहे. सोहना विधानसभा मतदारसंघाची तिकीट तर पाच कोटी रुपयांना विकली गेली आहे, असा खळबळजनक आरोप हरयाणा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अशोक तन्वर यांनी बुधवारी केला.
तन्वर व त्यांच्या समर्थकांनी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाबाहेर निदर्शने करून हरयाणातील काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारी यादीवर नाराजी व्यक्त केली. राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व संपलेय. पक्षवाढीसाठी आम्ही घाम गाळला, मात्र वरिष्ठांकडून एकेकाळी पक्षावर टीका करणाऱयांना विधानसभेची उमेदवारी दिली जात आहे हा न्याय कुठला, असा संतप्त सवाल तन्वर यांनी केला.
भाजपकडून सहा वेळा ऑफर होती!
काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे संतापलेल्या तन्वर यांनी आपल्याला भाजपने सहा वेळा ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला. मी कधीही त्या ऑफर्सचा स्वीकार केला नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यात भाजपचे सरकार बनले नव्हते, तर बनवले गेले होते. आज भाजपमध्ये असलेल्या 14 आमदारांची काँग्रेसने हकालपट्टी केली होती. तसेच सात खासदारांचा बॅकग्राऊंड काँग्रेसचा आहे, असेही ते म्हणाले.

























































