उत्तर प्रदेश अजूनही धुमसतोय…जातीय दंगे भडकणार? भयंकर कट शिजल्याचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाथरस येथील 19 वर्षीय दलित तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार आणि हत्याकाडांचे पडसाद देशभर उमटत असून, उत्तर प्रदेश अद्याप घुमसत आहे. उत्तर प्रदेशात जातीय दंगली भडविण्याचा भयंकर कट शिजल्याचा दावा तेथील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.

hathras-kolkata-student-protest

  • हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीमार्फत करण्याबाबतच्या याचिकेवर उद्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
  • पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा भीम आर्मीचे चंद्रशेखर आणि 500 काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल केला.

hathras-police-and-politics-clash

हाथरसच्या अमानुष घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी तणाव निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी ज्यांना विकास आवडत नाही. त्यांना राज्यात जातीय दंगली भडकवायच्या आहेत. त्यांना दंगलीच्या नावाखाली राजकारण करण्याची संधी हाथरस प्रकरणाने मिळाली आहे. ते कट रचत आहेत, असा आरोप विरोधकांवर केला होता. सोमवारी उत्तर प्रदेश सुरक्षा यंत्रणांनीही जातीय दंगली भडविण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा केला आहे.

hathras-woman-protest

‘आप’ खासदार संजय सिंह यांच्यावर शाई फेकली

हाथरस येथील पीडित तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ गेले होते. कुटुंबियांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतर मिडियाशी बोलताना संजय सिंह यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने काळी शाई फेकली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्याच शाईने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा काळा इतिहास लिहला जाईल, अशी टीका ‘आप’ने केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही योगी आदित्यनाथ सरकारवर निशाना साधला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पीडित कुटुंबीयांशी संवाद साधणार का? – प्रियंका गांधी-वढेरा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संवादातून समस्यांवर उपाय शोधण्याचे काल म्हटले होते. यावर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत. मग आता मुख्यमंत्री पीडित कुटुंबियांशी संवाद साधणार का? हाथरसच्या जिल्हाधिकाऱयावर कारवाई कधी करणार? न्यायालयीन चौकशीचे आदेश कधी देणार? पीडितेच्या कुटुंबियांची व्यथा ऐकून घेणे ही पहिली पायरी आहे; परंतु भाजपच पीडितेविषयी वाईट प्रचार करीत आहे, अशी टीका प्रियंका गांधी-वढेरा यांनी केली आहे.

रात्रीतून वेबसाईट निर्माण केली

  • उत्तर प्रदेश सरकारचा सुरक्षा यंत्रणेने याबाबतचा अहवाल तयार करून दंगल भडकविण्याचा कट नियोजनबद्ध पद्धतीने रचला गेल्याचे म्हटले आहे.
  • justiceforhathrasvictim.cardd.co ही वेबसाईट रात्रीतून तयार केली. हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याची माहिती देण्यात आली आहे. पीएफआय, एसडीपीआय यासारख्या संघटनांनी ही वेबसाईट तयार केली आहे.
  • पीडित कुटुंबाला मदतीच्या नावाखाली हिंसाचार भडकविण्यासाठी निधी जमा केला जात आहे.24 तासांत 19 एफआयआरची नोंद
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशात विविध व्यक्ती आणि गटांवर 19 एफआयआरची नोंद पोलिसांनी केली आहे.
  • देशद्रोह, राज्याविरुद्ध कट, आंतरराष्ट्रीय कट, धार्मिक भेदभाव पसरविणे, दंगल भडकवण्याचा कट आदी गुन्हे या एफआयआरमध्ये नोंदविण्यात आले आहेत.
  • हाथरस येथे विविध विरोधी पक्षांचे नेते पीडित कुटुंबियांची भेट घेत आहेत. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांकडून कोरोना काळातील सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन आदी गुन्हे दाखल केले जात आहेत.

उत्तर प्रदेश पोलिसांनी मागितली प्रियंका यांची माफी

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांना एका पोलिसाने केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांची माफी मागितली आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह पाच नेत्यांनी शनिवारी हाथरस येथे पीडित कुटुंबियांची भेट घेतली. तत्पूर्वी नोएडाच्या डीएटी टोलनाक्यावर गोंधळ उडाला. एका पोलिसांने प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती.