
“भगवद्गीता ही आपल्या अभ्यासक्रमात आली पाहिजे. दुर्दैवाने तिचे स्थान कोर्टात आहे. कोर्टाऐवजी ती अभ्यासक्रमात आली तर समाजामध्ये अनेक सकारात्मक बदल होतील,” असा आशावाद ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्री यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या 68 व्या विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये ‘श्री संत ज्ञानेश्वर आणि आधुनिक युग’ या विषयावर ते बोलत होते. ‘ज्ञानेश्वरी’ हा प्रगल्भ ग्रंथ आहे. ज्ञानासारखे श्रेष्ठ विश्वात दुसरे काहीच नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे कार्य आणि जीवन विलक्षण आहे. सोळाव्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिणारे आणि 56 भाषांचा गौरव करणारे अद्वितीय असे व्यक्तिमत्त्व होते, असे पालवे महाराज म्हणाले.
आधुनिक युगात व्यक्ती संकुचित होत चालली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. माणूस इंटरनेटमध्ये गुरफटून पडलेला असून सुखलोलुप वृत्ती फोफावत आहे. स्पर्धेमुळे माणूस आनंद गमावून बसलेला आहे. त्यातून आरोग्याची हेळसांड होत आहे. अशा वेळी विश्वशांतीच्या दृष्टीने मानवता धर्मासाठी एकत्र यावे लागेल, असेही पालवे महाराज म्हणाले.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळ हे लहान वयातच मुलांना चांगले संस्कार आणि शिक्षणासाठी मदत करीत आहे. त्यामुळे मुलांचे भवितव्य उज्ज्वल होण्यास मदत होईल, असे गौरवोद्गार न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे उपमहाव्यवस्थापक आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व्यंकटेश अय्यर यांनी काढले. प्रास्ताविक सुधीर फके यांनी केले. यावेळी कौशल राणे, साईश ताम्हणे, वेद गावडे, सतीश घाडी उपस्थित होते.




























































