
आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपण अनेक विविध पदार्थांचा आहारामध्ये समावेश करतो. आपल्या ताटातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लोणचं. तोंडीलावणीसाठी लागणारे लोणचं तोंडाची चव वाढवते. याशिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा लोणचं खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आरोग्यासाठी लोणचं खाण्याचे अगणित फायदे आहेत.
वरण भाताच्या जोडीला लोणचं खाण्याची प्रथा आपल्याकडे आज नाही. तर लोणच्याचं महत्त्व हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये फार पूर्वीपासून आहे. पूर्वीच्या काळी लोणचं करणं हा एक यथासांग कार्यक्रम असायचा. घरातील आजी, काकी लोणचं करताना तल्लीन होऊन करायच्या. लोणचं म्हणजे वर्षभराची बेगमी असायची. नानाविध लोणची ही आपल्या स्वयंपाकघरातील बरण्यांमध्ये विराजमान व्हायची. गृहिणी घाई गडबडीत असल्यावर ती हमखास खिचडी भात किंवा डाळ खिचडी असा बेत करते. या डाळ खिचडीच्या जोडीला पापड किंवा लोणचं हे हमखास असतंच. अनेकांसाठी आजही वरण भात आणि लोणचं हा एक उत्तम पोटभरीचा पर्याय मानला जातो.
लोणचं करणं हा आपल्याकडे परंपरागत प्रथेचा भाग आहे. एक काळ होता, आपल्या घरातील काकी, आजी या लोणचं करण्यासाठी सरसावुन बसायच्या. आजही आपल्या धावपळीच्या युगात घरी लोणचं केलं नाही तरी, आपल्या किचनमध्ये लोणच्याची बाटली ही असतेच.
लोणचं खाण्याचं महत्त्व
पचनसंस्था सुधारण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोणचं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं.
व्हिटॅमिन सी हे लोणच्यामध्ये मुबलक प्रमाणात असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी लोणचं हे गुणकारी आहे.
रक्तातील साखरेची पातळी सुद्धा लोणचं खाण्यामुळे कमी राहण्यास मदत होते.
शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी लोणचं खाणं हा एक उत्तम पर्याय आहे.
लोणचं हे आंबवलेले असल्यामुळे त्यात असलेल्या प्रोबायोटिक्समुळे आपल्या आतड्याचे आरोग्य उत्तम राखले जाते.