मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी ऑनलाईन पाहता येणार, थेट प्रक्षेपणासाठी तांत्रिक व्यवस्था प्रगतिपथावर

मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीचे आता थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी सर्वसामान्यांना लाइव्ह पाहता येणार आहे. न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था प्रगतिपथावर असल्याची माहिती मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने आज दिली.

हायकोर्टाचे कामकाज लाइव्ह पाहता यावे यासाठी अॅड. मॅथ्यू नेदुंपरा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी खंडपीठाने सांगितले की, पूर्णपीठाने काही न्यायालयांचे थेट प्रक्षेपण करण्याचा ठराव मंजूर केला असून त्यानुसार तांत्रिक व्यवस्था केल्या जात आहेत. सुरुवातीला पाच खंडपीठाच्या सुनावणींचे थेट प्रक्षेपण केले जाईल. मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले, न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती मिलिंद साठये, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील या खंडपीठाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.