अनिल देशमुख यांच्या याचिकेवर चार आठवडय़ांनी सुनावणी; सीबीआयला उत्तर देण्यासाठी दिली मुदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. हा एफआयआर रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेप्रकरणी सीबीआयला उत्तर देण्यासाठी हायकोर्टाने चार आठवडय़ांची मुदत दिली आहे.

 माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याद्वारे करण्यात आलेल्या आरोपांची सीबीआय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. परमबीर यांच्यासह डॉ. जयश्री पाटील आणि इतरही दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत सीबीआयला प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसांपूर्वी सीबीआयने देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांची नागपूर येथे चौकशी केली तसेच त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला.

सीबीआयकडून दाखल करण्यात आलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. एफआयआर रद्द करण्याबरोबरच आपल्यावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, त्यापासून अंतरिम संरक्षण देण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. तेव्हा याचिकेला सीबीआयने जोरदार विरोध केला व याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली तसेच याचिकेची प्रत बुधवारी मिळाल्याची माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी हायकोर्टाला दिली. अनिल देशमुख यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या या याचिकेला उत्तर देण्यासाठी सीबीआयच्या वतीने न्यायमूर्तींकडे मुदत मागण्यात आली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर आज पार पडलेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने सीबीआयची मागणी मंजूर केली व चार आठवडय़ांची मुदत देत सुनावणी तहकूब केली.

  • देशमुखांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये, त्यांना अंतरिम संरक्षण देण्यात यावे अशी विनंती सरकारच्या वतीने करण्यात आली. मात्र खंडपीठाने त्यास नकार दिला व गरज भासल्यास देशमुखांना सुट्टीकालीन न्यायालयात दाद मागण्यासाठी तातडीने अर्ज करण्याची मुभा दिली. त्याचबरोबर कारवाईपूर्वी 48 तास आधी नोटीस देणे बंधनकारक असल्याचेही हायकोर्टाने सीबीआयला बजावले.

राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणीही तहकूब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या खंडणीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरला राज्य सरकारने जोरदार आक्षेप घेतला आहे. अनिल देशमुखांविरुद्ध गुन्हा दाखल करून महाविकास आघाडी सरकार डळमळीत करण्याचा सीबीआयचा डाव असल्याचा दावा राज्य सरकारने केला असून एफआयआरमधील आक्षेपार्ह दोन परिच्छेद रद्द करण्याची तसेच सीबीआयच्या तपासाला स्थगिती देण्याची मागणी शासनाने केली आहे.  मात्र वेळेअभावी या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देत हायकोर्टाने सुनावणी तहकूब केली.