अनिल देशमुखांच्या याचिकेवर द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेच्या वैधतेला ‘ईडी’ने आक्षेप घेतल्याने ही याचिका द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणीसाठी वर्ग करण्याचे आदेश न्यायमूर्ती एस. के. शिंदे यांनी आज हायकोर्ट रजिस्ट्रीला दिले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये खंडणी वसुलीचा गंभीर आरोप केला असून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्यात येत असून ईडीकडून आतापर्यंत अनिल देशमुख यांना पाचवेळा समन्स बजावण्यात आले आहेत. ईडीच्या समन्सविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्यात यावे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. कागदपत्रे आणि जबाब हा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदविण्याची परवानगीही याचिकेतून मागण्यात आली आहे. तसेच अधिकृत मध्यस्थामार्फत (एजंट) ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याची परवानगी उच्च न्यायालयाने आपल्याला द्यावी, अशी विनंतीही देशमुख यांनी आपल्या याचिकेतून केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या