लीलावतीच्या  तक्रारीवर धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी; 17 मार्चला देखरेख समितीसमोर सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे येथील लीलावती रुग्णालयातील अनियमित कारभार व रुग्णाकडून आकारण्यात आलेल्या अनामत शुल्काच्या संदर्भातील तक्रारीच्या संदर्भात येत्या 17 मार्चला धर्मादाय आयुक्तांच्या देखरेख समितीसमोर सुनावणी होणार आहे, अशी माहिती आज विधानसभेत लेखी उत्तरात देण्यात आली.

लीलावती रुग्णालयातील अनियमित कारभार व एका रुग्णाच्या संदर्भात शिवसेना आमदार संजय पोतनीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. विकास म्हात्रे या रुग्णाबाबत हा प्रकार घडला होता. दोन लाख रुपये जमा केल्याशिवाय रुग्णालयात दाखल करून  घेता येणार नाही असे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. म्हात्रे यांच्या ओळखीच्या लोकप्रतिनिधींनी एक लाख रुपये भरून उर्वरित रक्कम दुसऱया दिवशी भरू अशी विनंती केली होती. पण दुसऱया दिवशी सर्व रक्कम भरल्यानंतरच म्हात्रे यांना दाखल करून घेण्यात आल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावतीने लेखी उत्तर देण्यात आले. दोन लाख रुपयांची अनामत रक्कम भरल्यानंतरच विकास म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. यामध्ये उच्च न्यायालयीन योजनेतील खंड तीनचे रुग्णालयाकडून उल्लंघन झाल्याचे दिसून आल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. यासंदर्भात सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी (रुग्णालय) लीलावती रुग्णालयाला खुलासा करण्याचे आदेश दिले होते.