प्रभाग रचना, सीमांकनाची हायकोर्टात आज सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी केलेली प्रभाग रचना व सीमांकनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज, मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

बारामती येथील काही उमेदवारांचे अर्ज मुदतीनंतरही स्विकारण्याचे आदेश तेथील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाला राज्य निवडणूक आयोगाने आव्हान दिले आहे. मुदतीनंतर अर्ज स्विकारल्यास अन्य उमेदवारदेखील या लाभासाठी दावा करतील, असा युक्तिवाद आयोगाने केला. खंडपीठाने यावरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.

उमेदवारी अर्ज भरता आलेल्या काही इच्छुक उमेदवारांना दिलासा देण्यास मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर न्या. गौतम अंनखड यांच्या खंडपीठाने नकार दिला. अर्ज भरता आल्यास अपीलाची तरतूद आहे. अपील प्राधिकरणाकडे दाद मागा, असे आदेश न्यायालयाने काही उमेदवारांना दिले. काहींचे अर्ज अपील प्राधिकरणाने फेटाळले आहेत. त्यात हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला.

 काय आहे प्रकरण 

निवडणूक आयोगाने केलेल्या प्रभाग रचनेनुसार या निवडणुकीत प्रभाग रचना करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र तसे न करता राज्य शासनाने नव्याने प्रभाग रचना केली, असा आरोप करत काही याचिका दाखल झाल्या आहेत. तर सीमांकनामुळे मतदार दुसऱया मतदारसंघात विभागले गेले आहेत, असा दावा करणाऱया काही याचिका आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरु आहे.