
मुंबई शहर व उपनगरातून सकाळचे कोवळे ऊन गायब झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशांची मोठी वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी कोवळय़ा उन्हाऐवजी तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हवेत आर्द्रता वाढल्याने नागरिक घामाघूम होत असल्याचे हवामानतज्ञांचे मत आहे.
मागील आठवडाभरात शहराच्या किमान तापमानाची पातळी 26 अंशांच्या वर राहिली आहे. शुक्रवारपासून हे तापमान चढेच राहिले आहे. रविवारी सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा तीन अंशांनी अधिक 26.8 अंश इतके किमान तापमान नोंद झाले. याचवेळी कुलाब्यातही दोन अंशांनी अधिक 26.6 अंश तापमान नोंदवले गेले. याचवेळी कुलाब्यात 89 टक्के तर सांताक्रुझमध्ये 75 टक्के इतके हवेतील आर्द्रतेचे प्रमाण होते. दोन्ही ठिकाणी 10 टक्क्यांनी अधिक आर्द्रता नोंद झाली. दिवसा सूर्याच्या किरणांमुळे तयार होणारी उष्ण हवा रात्रीच्या सुमारास बाहेर जाते. मात्र सध्या बाष्पाचे वाढलेले प्रमाण ती उष्ण हवा अर्थात ‘आऊटगोइंग रेडिएशन’ रोखत आहे. त्यामुळे सकाळचे तापमान अधिक राहिले आहे, असे कुलाबा वेधशाळेतील अधिकाऱयांनी सांगितले.
महाबळेश्वर तापले!
तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असून पाऱयाने चाळिशी ओलांडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून चाळीशीच्या वर असणारा पुणे शहरातील तापमानाचा पारा आज 38.7 अंश सेल्सिअसवर स्थिरावला. राज्यात आज सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला येथे 43.6 अंश, तर सर्वांत कमी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे 30.9 अंश सेल्सिअस एवढी झाली. एकीकडे उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असताना कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवारी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भामध्ये पुढील तीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
मॉर्निंग वॉक आटोपता!
वातावरण बदलाचा मुंबईतील कोवळय़ा उन्हावर परिणाम झाला आहे. त्यामुळे सकाळच्या सुमारास घराबाहेर पडणे असह्य झाल्याने मुंबईकरांनी आपला मॉर्निंग वॉक आटोपता घेतला आहे. एरव्ही आठ-नऊ वाजेपर्यंत मॉर्निंग वॉक करणारे अनेक मुंबईकर सध्या सातच्या आतच घरी परतत आहेत.
प्रमुख शहरांचे तापमान
मुंबई 33.8, रत्नागिरी 33.7, पुणे 38.7, जळगाव 42.5, कोल्हापूर 33.2, महाबळेश्वर 30.9, नाशिक 37.8, सातारा 36.8, सोलापूर 40.2, संभाजीनगर 41.0, परभणी 40.5, अकोला 43.6, अमरावती 43.0, बुलढाणा 41.0, ब्रह्मपुरी 40.4, चंद्रपूर 42.0, गोंदिया 40.2, नागपूर 40.4, वर्धा 42.2.





























































