
महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षातील बजेटवर चर्चा करण्यासाठी आयोजित स्थायी समितीच्या सभेत आज बजेटवरून जोरदार खडाजंगी झाली. सभेला अनेक विभागप्रमुख गैरहजर होते. त्यावरून सभेला अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे सभापतींसह सदस्य संतप्त झाले. नगररचना, आरोग्य, अतिक्रमण निर्मूलन विभागांसह अनेक प्रभाग अधिकाऱयांच्या अनुपस्थितीवरून सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यानंतर मंगळवारी (17 रोजी) स्थायी समितीला सादर केलेल्या बजेटवरील विविध तरतुदींवर चर्चा झाली. हे बजेट फुगविलेले आहे. बजेटमधील अनेक आकडेही चुकीचे आहेत, असा आरोप सदस्यांनी केला.
अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आलेल्या 1710 कोटींच्या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आज दुपारी 1 वाजता महापालिकेच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीला सभापती सुभाष लांडे, आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त मेहर लहारे, माजी सभापती बाबासाहेब वाकावे, मनोज कोतकर, नगरसेवक निखिल वारे, मनोज दुल्लम, सुरेश बनसोडे, राहुल कातोरे, संध्या पवार, अनिल लांडे यांच्यासह सर्व समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी सभापती लांडे, नगरसेवक वाकावे व वारे यांनी अधिकाऱयांच्या अनुपस्थितीवरून सवाल उपस्थित करीत सर्व अधिकारी हजर असल्याशिवाय सभा सुरू होणार नाही, असा ठाम पवित्रा घेतला. नगरसेवक वारे यांनी शहरात अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी पाच कोटींची तरतूद करण्याची मागणी केली.
सभेत कंत्राटी कर्मचाऱयांची उपस्थिती व कामकाजावरूनही चर्चा रंगली. वाकळे यांनी कामावर कमी उपस्थिती असतानाही जादा उपस्थिती दाखविली जाते, असा आरोप केला. त्यावर आयुक्त डांगे यांनी संबंधित विभागप्रमुखांकडे नियंत्रण असल्याचे सांगितले. कंत्राटी कर्मचाऱयांसाठी बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करावी, अशी मागणी त्यांनी केली. वारे यांनी सर्व विभागांतील कर्मचाऱयांची संख्या, जबाबदाऱया व कामाची तपशीलवार यादी सादर करण्याची मागणी केली.
नगरसेवक मनोज कोतकर यांनी 1710 कोटींचे अंदाजपत्रक फुगीर असल्याचा आरोप केला. शिक्षण विभागावर कोटय़वधी खर्च होतो. मात्र, शाळांमध्ये 20-25 विद्यार्थीच असतात. अशा परिस्थितीत हा खर्च कितपत योग्य आहे? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
वारे यांनी बजेटमधील आकडे चुकीचे असल्याचे सांगितले. 1710 कोटींपैकी 1100 कोटी शासनाचे असल्याचे सांगत स्थानिक उत्पन्न वाढण्यावर भर देण्यात यावा, असे सांगितले. बाबासाहेब वाकडे यांनी खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्याच्या उपाययोजना करण्याची मागणी केली. आयुक्तांनी 2003च्या तरतुदीनुसार करआकारणी होत असल्याने अनेकांना आम्ही नोटिसा दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीत सदस्यांनी प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत बजेटमध्ये दिलेले आकडे चुकीचे आहेत व हे सगळे फुगविलेले आकडे आहेत, असा आरोप केला.




























































