खेळपट्टीवरून ‘वादा’ची बॅटिंग, गंभीर अन् फोर्टिसची जुंपली

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हल क्रिकेट स्टेडियमचे मुख्य पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात मंगळवारी मैदानाच्या मुख्य खेळपट्टीच्या पाहणीदरम्यान तीव्र वाद झाला. एका वृत्तसंस्थेने या वादाचा व्हिडीओ जारी केला असून टीम इंडियाचे प्रशिक्षक खेळपट्टीच्या स्थितीवर नाराज असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान ही घटना घडली. गौतम गंभीर खेळपट्टीची पाहणी करत असताना क्युरेटर ली फोर्टिस यांच्याशी त्यांची शाब्दिक चकमक झाली. दोघांमध्ये खेळपट्टीची स्थिती आणि त्याच्या वागणुकीवरून चर्चा सुरू होती. याचेच नंतर वादात रूपांतर झाले. व्हिडीओत गंभीर हे फोर्टिस यांना स्पष्टपणे म्हणत आहेत की, ‘तुम्ही फक्त ग्राऊंड्समॅन आहात, आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते शिकवू नका.’ यानंतर हिंदुस्थानी संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक घटनास्थळी आले आणि फोर्टिस यांना शांतपणे बाजूला नेऊन बोलणी केली. विशेष म्हणजे, यापूर्वीही फोर्टिस यांचा हिंदुस्थानी महिला संघाच्या खेळाडूंसोबतही खेळपट्टीच्या मुद्दय़ावरून वाद झाला होता.

हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात 31 जुलैपासून अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पाचव्या व अंतिम कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. सध्या इंग्लंड 2-1 ने मालिकेत आघाडीवर असून टीम इंडियाकडे हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे.