
गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने खेडमध्ये आज दुपारपासून जोरदार बरसायला सुरवात केली असल्याने जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजाच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरीकांना घरातून बाहेर पडणे ही अशक्य झाले आहे.
यावर्षी कोकणात सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला त्यामुळे जूलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात तालूक्यात अनेकदा पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तीन ते चार वेळा खेडची बाजारपेठ पाण्याखाली गेली तर जगबूडीच्या पाण्याची पातळी वाढल्याने जगबूडी पूल तब्बल १२ वेळा वाहतूकीस बंद करावा लागला. मुसळधार पावसामुळे तालुक्यात घर, गोठ्यांची पडझड होवून मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले.
या वर्षी पावसाने उडवलेल्या दाणादाणीमुळे पाऊस कधी एकदाचा जातो असे सर्वानाच वाटत होते . अनंत चतुर्दशी पासून पाऊस कमी झाल्याने सर्वानीच सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र आज दुपार पासून पावसाने पुन्हा जोरदार बरसायला सुरूवात केली असल्याने तालुक्यातील जनता हवालदील झाली आहे.



























































