मुसळधार पावसाने सोलापूरकरांना झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर शहर व परिसरात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी विजेचे खांब व झाडे उन्मळून पडली, तर अनेक भागात मुख्य रस्त्यावरच पाणी साचले होते. अनेकवेळा वीज खंडीत झाली होती.

गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पावसाची हजेरी सुरू होती. शुक्रवारी दुपारी दोनपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी वीज व ढगांच्या कडकडाटासह पावसाने झोडपल्यामुळे कर्णिकनगर येथे रस्त्याच्या कडेला असलेले विजेचे खांब व झाड अचानकपणे उन्मळून रस्त्यावर पडले.

जुना विडी घरकुल वसाहतीतील अनेक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. आशानगर, सुनीलनगर, नीलमनगर व एम. आय. डी. सी. तील मुख्य रस्त्यावरच पाणी साचले होते. कर्णिकनगर जवळील वल्याळ क्रीडांगण पावसाच्या पाण्याने भरून वाहत असल्याचे चित्र होते. दुपारपासून कोसळणाऱया या पावसामुळे नागरिकांची व वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरू होती.