
संगमेश्वर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले असून सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भातशेती आडवी झाली. भातशेतीत पाणी साचले असल्याने शेती संकटात सापडली आहे. पावसाबरोबरच वादळी वारा सुटत असल्याने तयार भातशेती आडवी होत आहे.
भातशेती पसवण्यास सुरूवात झाली असतानाच संगमेश्वर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पसवलेली भातशेती आडवी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गणेशोत्सवादरम्यान झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या दरम्यान पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. पुराच्या पाण्यामुळे भात शेती नष्ट होत असताना आता पावसामुळे पसवलेली भात शेती आडवी होत आहे. तसेच जंगली प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दोन दिवस संध्याकाळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले होते. सोमवारी संध्याकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीमध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे कापलेले भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
पूरग्रस्त शेतीची अजून नुकसान भरपाई नाही
यावर्षी मुसळधार पावसाने आलेल्या पुरामुळे नदीकाठची शेतीचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानीचा पंचनामा करूनही अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. परतीचा पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.





























































