
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे डोंगरमाथ्यावरून धरणात मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. धरणातील पाणीपातळी झपाटय़ाने वाढत असल्याने धरणाच्या वीजगृहातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आज सायंकाळी चार वाजता वाढविण्यात आला आहे. सध्या चांदोली धरणाच्या वीजगृहातून 1500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
चांदोली परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून, रविवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आठ तासांत 17 मिलिमीटर, तर आजअखेर 1405 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणाची पाणीपातळीही झपाटय़ाने वाढत आहे. आज सायंकाळी चार वाजता धरणाची पाणीपातळी 620.50 मीटर होती. तर, धरणात 801.607 दलघमी म्हणजेच 28.31 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी 82.28 इतकी होती. सध्या धरणाच्या वीजगृहातून वारणा नदीपात्रात 1500 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. पावसामुळे डोंगरमाथ्यावरील लहान-मोठे धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत.




























































