चिपळूणच्या अडरे गावात ढगफुट; तासाभरात 110 मिलीमीटर पाऊस, नद्या-नाल्यांना पुर 

चिपळूणच्या अडरे गावात ढगफुटी होऊन अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक म्हणजेच तब्बल 110 मिलीमीटर पाऊस झाला. या पावसामुळे उकाडयापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु, अनेक घरांचे नुकसानही झाले. अनारी परिसरातील नद्याही प्रवाहीत झाल्या.

प्रचंड पाऊस झाल्यामुळे नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. राज्यात अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळी वायांसह जोरदार पावसाचे व्हीडियो व्हायरल झाले आहेत. चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाचे व्हीडियोही समोर आले आहेत. नद्या दुथडी भरून वाहू लागल्यामुळे अनारी गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्यही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. जुलैमध्ये पडतो तसा पाऊस अवघ्या तासाभरात झाला. हवामान विभागाने मात्र इतका पाऊस कसा झाला याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

आंबा बागायतदारांचे नुकसान

या पावसामुळे आंबा बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले.  शेवटच्या टप्प्यातील आंबा अजूनही झाडावरच आहे. अशातच अचानक पाऊस झाल्याने आंबा उतरवण्यासाठी बागातदरांची चांगलीच धावपळ उडाली. पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून गावांचा संपर्क तुटल्याचे चित्र आहे.

येत्या 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार वायांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वारे 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.  हवामान ढगाळ राहील तर हलका पाऊस पडेल.

 

यंदा सरासरीहून अधिक पाऊस

‘अल नीनो’ आणि ‘ला नीना’ हे दोन पॅटर्न मान्सूनवर परिणामकारक ठरतात. गेल्या वर्षी ‘अल निनो’ सक्रिय होता. मात्र यंदा अल नीनोसारखी परिस्थिती राहाणार नाही. तर ‘ला नीना’ची स्थिती निर्माण होईल. गेल्या वर्षी सरासरीहून कमी म्हणजेच 94 टक्के पाऊस झाला होता. 2020 ते 2022 दरम्यान ‘ला नीना’मुळे अनुक्रमे 109 टक्के, 99 टक्के आणि 106 टक्के इतका पाऊस झाला होता. यंदाही सरासरीहून अधिक पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.