गोव्यात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, चोर्ला घाटात कोसळली दरड

532

गोव्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चोर्ला घाटात दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवून रस्ता खुला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी नद्या,नाल्यांना पुर आल्याने सखल भागात पाणी साचले आहे. कॅसलरॉक-वास्को दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे सेवा देखील ठप्प झाली आहे. लोंढा येथे अडकलेल्या प्रवाशांना बस मधून सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.

सत्तरी,डिचोली आणि पेडणे तालुक्यातील नदी किनारच्या गावात पाणी शिरल्याने बहुतेक रस्ते पाण्याखाली गेले होते. शापोरा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे कोलवाळ, रेवोडा, नादोडा, कामूर्ली गावात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोलवाळ येथील दोन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.

पेडणे तालुक्यातील हसापुर, चांदेल गावात पूराचे पाणी शिरल्याने काही भागांचा संपर्क तुटला होता. नाणूस- वाळपई येथील जय श्रीराम गोसंवर्धन गोशाळाचा बराच भाग पाण्याखाली गेल्यामुळे संस्था चालकांना प्रशासनाची मदत मागावी लागली.

आपली प्रतिक्रिया द्या