
सामना ऑनलाईन, पणजी
मुंबई, कोकणकिनापट्टीप्रमाणेच शेजारचे राज्य असलेल्या गोव्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. पणजीत मंगळवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 पर्यंत एकूण 2 इंच पाऊस नोंदवण्यात आला. यासह पणजीत पावसाने सत्तर इंचांचा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस 10 इंचाने जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.
गोव्यातील जवळपास सगळ्या नद्या दुथडी भरून वहात आहेत. अनेक भागांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी 24 तासात राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. गोव्यात आगामी 24 तासात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल तसेच वाऱ्याचा वेगही वाढलेला असेल असा इशारा दिला आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असेही वेधशाळेने सांगितले आहे.
गोव्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक 5.50 इंच पाऊस दाबोळी मध्ये पडला. पेडणे व फोंडा येथे पावणेचार इंच पाऊस झाला. मुरगावात 3 इंच तर पणजीत मडगाव, जुने गोवे येथे प्रत्येकी 2.5 इंच पाऊस पडला. साखळीत 3.5 इंच तर केपे येथे 2 इंच व सांगेमध्ये 1 इंच पाऊस झाला. सांगेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 78 इंच एवढी पावसाची नोंद झाली आहे. जुलैमधील पडलेल्या पावसाने आतापर्यंतचा सर्व अनुशेष भरून काढला आहे.

























































