
सामना प्रतिनिधी । मालवण
मालवण शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. समुद्री उधाणाचा जोर आजच्या चौथ्या दिवशीही कायम होता. दिवसभरात 100 मिलिमीटरचा टप्पा पावसाने पार केला. अनेक ठिकाणी घडलेल्या पडझडीच्या घटनांमध्ये हजारोंचे नुकसान झाले आहे. तर मालवण शहरातील वीजपुरवठा दिवसभर खंडित होता.
दरम्यान, किनारपट्टी भागाबरोबरच सागरी उधाणामुळे कालावल खाडीपात्राने धोक्याची पातळी ओलांडल्याने मसुरेतील खोत जुवा बेटावर पुराचे पाणी घुसले. अनेक घरांना पाण्याने वेढा घातला. घरांसह माडबागायतींना धोका निर्माण झाला आहे. चहूबाजूने पाणी बेटावर घुसल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. बेटास धोका पोहचू नये यासाठी शासनाकडे गेली काही वर्षे संरक्षक बंधार्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यावरील कार्यवाही अद्याप न झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसेच आपत्कालीन स्थितीत बेटावरून बाहेर जाण्यासाठी छोटा पूल अथवा साकव उभारावा अशी मागणी केली जात आहे.
पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला असून रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम होता. समुद्री उधाणामुळे समुद्राच्या अजस्र लाटांचा मारा किनारपट्टीस बसत असून चौथ्या दिवशीही देवबाग किनारपट्टीला समुद्राच्या लाटांचा तडाखा कायम होता.
पडझडीत हजारोंचे नुकसान
वायरी मक्रेबाग येथील भाई गोवेकर यांच्या घराचे छप्पर कोसळून नुकसान झाले. वराड येथील केशव गणेश म्हाडगूत यांच्या घराची मातीची भिंत कोसळून 20 हजार, मसुरे देऊळवाडा येथील कृष्णा रावजी परब यांच्या घरावर झाड पडून 15 हजाराचे, गणपत दत्ताराम परब यांच्या छप्पराचे 8 हजाराचे नुकसान, शांताराम जयराम परब यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळून 9 हजारांचे तर वनिता सुदाम परब यांच्या घराची मातीची भिंत कोसळून 8 हजारांचे नुकसान झाले.
मसुरे गावचा संपर्क तुटला
गड नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून मसुरे व परिसरात पाणी घुसले आहे. मसुरेला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाल्याने मसुरे गावाचा रस्ते मार्गाचा संपर्क तुटला होता.






















































