
सप्टेंबर महिन्यात मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. गेल्या चौदा दिवसांत मुंबईत 868 मिलिमीटर पाऊस पडला. सप्टेंबर महिन्यात एवढ्या मोठय़ा प्रमाणात पावसाची नोंद होण्याची गेल्या सहा दशकांतील ही पहिलीच वेळ आहे. त्याआधी 1954 मध्ये सप्टेंबर महिन्यात मुंबईत 920 मिलिमीटर एवढी नोंद झाली होती.
मान्सूनच्या आगमनापासूनच मुंबई, ठाण्यासह कोकण परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. प्रत्येक महिन्यात दरवर्षीच्या सरासरीपेक्षा जादा पावसाची नोंद झाली आहे. त्याला सप्टेंबर महिनाही अपवाद राहिलेला नाही. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात केवळ 73 मिलिमीटर एवढ्या कमी पावसाची नोंदी झाली होती, मात्र यंदा अर्धा सप्टेंबर बाकी असतानाच पावसाने विक्रम करत मागील सहा दशकांतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. मुंबईत दरवर्षी संपूर्ण पावसाळ्यात सरासरी 2051 मिलिमीटर पावसाची नोंद होते, पण यंदा आतापर्यंत 3422 मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे.