
मुंबईत परतलेल्या पावसाने चांगलेच ठाण मांडले असून सरीवर सरी बरसत आहेत. आजही मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस झाला. तर उद्या किमान 100 मिमी पाऊस पडणार असल्याने खबरदारीचा ‘ऑरेंज’ तर पुढील दोन दिवस ‘यलो’ अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली असून मुंबईकरांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत आज झालेल्या पावसामुळे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. तर मुंबई शहरात तीन ठिकाणी, पूर्व उपनगरात 4 ठिकाणी तर पश्चिम उपनगरात 6 ठिकाणी झाड-फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. तर संपूर्ण मुंबईत तीन ठिकाणी घर-भिंती कोसळल्याच्या तर तीन ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.
असा झाला पाऊस
मुंबई शहर – 17.44 मिमी
पूर्व उपनगर – 22.55 मिमी
पश्चिम उपनगर – 18.87 मिमी
पाकसाळी आजारांचा विळखा
16 दिवसांत मलेरिया 355, डेंग्यूचे 264 रुग्ण
मुंबईत पावसाचा जोर वाढला असताना पावसाळी आजारही वेगाने वाढले आहेत. 1 जुलैपासून आतापर्यंत मलेरियाचे 355, डेंग्यूचे 264, लेप्टोचे 104 रुण आढळले आहेत, तर गॅस्ट्रोचे 932 रुग्णांमध्ये निदान झाले आहे. जूनअखेरपासूनच पावसाळी आजार वाढले आहेत. यामध्ये नायर रुग्णालयात 38 वर्षीय महिलेचा लेप्टोची लागण होऊन मृत्यू झाला.
दिल्लीत पुढील पाच दिवस पावसाचे
दिल्लीत पावसाचा कहर सुरूच आहे. मंगळवारी यमुना नदीच्या पाण्याचा स्तर कमी झाला असला तरी पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीतील राजघाटात गेल्या आठवडय़ापासून पाणी भरलेले आहे.






























































