
दोन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने आज तिसऱ्या दिवशीही दिवसभर दमदार हजेरी लावली. सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. आज सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईत 161 मिमीटर पावसाची नोंद झाली. दहा तासांनंतरही थांबून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे मुंबईत काही सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू होती तर काही ठिकाणी बस मार्गात बदल करण्यात आला आहे.
जून महिना संपता संपता पावसाने बुधवारपासून मुंबईत जोरदार हजेरी लावली. आज दिवसभर पावसाने बरसणे सुरू ठेवले. ढगाळ वातावरण आणि जोरदार सरी यामुळे मुंबई तिसऱ्या दिवशीही ओलीचिंब झाली. अंधेरी सबवेत पाणी तीन फूट पाणी साचल्याने हा सबवे दुपारी साडेतीन वाजता बंद करण्यात आला होता. मात्र पंपाच्या सहाय्याने पाण्याचा निचरा झाल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता हा सबवे खुला करण्यात आला. परंतु दोन तास या परिसरात वाहतूक कोंडी झाली.
चेंबूर, टिळकनगर, कुर्ला, दादर, हिंदमाता, गांधी मार्केट, वांद्रे आदी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. मात्र दुपारनंतर काही वेळ पावसाने विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा झाला. जोरदार पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक जाम झाली होती.
सखल भागात पाणी साचू नयेत म्हणून मुंबई महापालिकेने सखल भागांत उपसा पंप लावले आहेत. दरम्यान, बेस्टने 341, 411, 25, 22 व 312 बस मार्गात बदल करण्यात आला होता. त्याचबरोबर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्यम आणि पश्चिम लोकल वाहतुकीदरम्यान पाणी साचले नाही. त्यामुळे या लोकल सेवांवर आज कोणताही परिणाम झाला नाही. सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी ते वाशी दरम्यानची सेवा सुरळीत सुरू होती, अशी माहिती मध्य रेल्वेच्या माहिती अधिकाऱ्याने दिली.
मुंबई किती पाऊस (सकाळी 8 ते संध्याकाळी 6)
शहर – 46 मिमी
पूर्व उपनगर – 55 मिमी
पश्चिम उपनगर – 60 मिमी
4 ठिकाणी पडझड, 23 ठिकाणी; झाडे पडली, दोन ठिकाणी शॉर्टसर्किट
जोरदार पावसामुळे मुंबईत 3, पूर्व उपनगरात 1 अशा एकूण 4 ठिकाणी घराचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या. संबंधित विभागाच्यावतीने मदतकार्य सुरू आहे. मुंबईत झाडे उन्मळून पडण्याचा घटनाही घडल्या आहेत. शहरात 5, पूर्व उपनगरात 9 आणि पश्चिम 9 ठिकाणी अशा 23 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडण्याच्या तक्रारी आल्या.
झाडे आणि फांद्या तोडून रस्ता तसेच अडथळे दूर करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबईत दोन ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. यातही कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
पुढील 24 तासांत मुसळधार
मुंबईत पावसाचा तडाका सुरूच राहणार असून येत्या 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस बरसणार आहे तर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान, 2 जुलैला मध्यरात्री भरतीला सुरुवात होणार असून सकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे. लाटांची उंची 0.92 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. दरम्यान, मुंबईकरांनी खूपच महत्त्वाचे काम असेल तर घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
24 तासांत 428 मीमिटर पाऊस
मुंबईत गेल्या 24 तासांत 428 मीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात 179.13, पश्मिच उपनगरात 140.58 मिमीटर तर पूर्व उपनगरात 109.06 मीमीटर पाऊस बरसला. मुंबईत सर्वात जास्त पाऊस जी-उत्तर विभागात येणाऱ्या दादर, धारावी, माहीम आणि माटुंगा बरसला. जी-उत्तरमध्ये 238 मीमिटर पाऊस पडला तर त्या खालोखाल जी-दक्षिण विभागात येणाऱ्या वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ भागात 208 मीमीटर पाऊस बरसला.



























































