धाराशिवमध्ये मोठ्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, 12.44 मी. मी. पावसाची नोंद

सामना प्रतिनिधी । धाराशिव

प्रदीर्घ विश्रांतीनंतर जिल्ह्यात मंगळवारी रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 12.44  मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील तीन महुसल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. निदान हा परतीचा पाऊस तरी जिल्ह्यात हजेरी लावेल अशी आशा बळीराजा बाळगून आहे.

यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस पडलेल्या पेरणीयोग्य पावसानंतर जिल्ह्याला पावसाने प्रचंड ओढ दिली होती. यामुळे अनेक भागातील खरीप हंगामातील सोयाबीनसह अनेक पिके वाया गेली आहेत. शेतकर्‍यांनी या पिकांत अक्षरशः नांगर फिरवला आहे. असे असताना रब्बी हंगामातील पेरण्याची तर आशा मावळली होती. परंतू मंगळवारी रात्री जिल्ह्यात वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकर्‍यांचा आशा प्रफुल्लित झाल्या आहेत.

बुधवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 12.44 मी. मी. पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 437 मी. मी. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या 56.95 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये पाडोळी 72, तुळजापूर 85 तर मंगरुळ मंडळात 130  मी. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या हातातून खरीप हंगाम तर वाया गेलाच आहे. परंतू पाऊस नाही पडला तर रब्बी हंगातील तर पेरणी सुध्दा होणार नाही. त्यामुळे मंगळवारी झालेल्या पावसामुळे बळीराजाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली तरच जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या होणार आहेत. मंगळवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील कांही भागात नुकसानही झाले आहे. वादळी वार्‍यासह आलेल्या या पावसामुळे ऊसाचे फड आडवे झाले असून ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीन शेतात काढून टाकले आहे, अशा शेतकर्‍यांनाचेही नुकसान झाले आहे.