
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पंढरपूर शहर व तालुक्याला दमदार पावसाने झोडपून काढले आहे. रविवारी रात्री व सोमवारी दुपारपर्यंत झालेल्या पावसाने शेतीपिकांमध्ये पाणी साचले आहे. तर, सततच्या पावसाने फळबागांना फटका बसत आहे. ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक रस्त्यांवरून पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.
पावसाळी हंगामातील गेले दोन महिने पावसाने पंढरपूर तालुक्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे ऐन पावसाळ्यात तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. बैलपोळा सणावरही दुष्काळाचे सावट होते. तर, जेमतेम पावसावर शेतकऱयांनी केलेल्या खरिपाच्या पेरण्या केलेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज भासू लागली होती. दरम्यान, गणेश आगमनाला पावसाने जोरदार हजेरी लावली. गौरी-गणपती सणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेली दोन आठवडे उसाच्या शेतात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून, मुळ्या कुजल्या जात आहेत.
सततच्या पावसामुळे द्राक्षे, बोरी, डाळिंब, सीताफळ, पेरू, पपई आदी पिकांवर बुरशी, कुजवा, तेल्या, मररोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. द्राक्ष बागांवर दावण्या, थ्रिप्स, तर डाळिंबावर तेल्या, कुजवा, मररोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. डाळिंबाची फुलगळ होत आहे. पावसामुळे औषध फवारणी करता येत नसल्याने फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यमाई तलाव ओव्हरफ्लो
पंढरपूर शहरालगतचा यमाई तलाव शंभर टक्के भरला आहे. सोमवारी दुपारनंतर तो ओव्हरफ्लो होऊन सांडव्यातून वाहू लागला आहे. गौरी-गणपतीच्या सणापासून सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने तलाव भरून वाहू लागल्याने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.





























































