परभणीत सहा मंडळात अतिवृष्टी; जोरदार पावसाने पिकांना फटका

परभणी जिल्ह्यात आठ दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. शनिवारी दुपारी तासभर जोरदार पावसाने हजेरी लावली. या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. तालुक्यातील काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. तर काही भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाच्या तडाख्याने शेतातील उभे पीके आडवी झाली आहेत.

पाऊस पडत असल्यामुळे धरण, छोटे-मोठे बंधारे, पाझर तलाव भरल्याने गोदावरी नदी, पूर्णा नदी दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यातच जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. पूर्णा मंडळात सर्वाधिक 110.5 मि.मी., परभणीत 90.4 मि.मी., पाथरी मंडळात 64 मि.मी., सेलू तालुक्यातील वालूर मंडळात 60 मि.मी., कुपटा 61.3 मि.मी. तर मानवत मंडळात 77.8 मि.मी. पाऊस झाला. या सहाही मंडळात अतिवृष्टी झाल्याने ओढे, नाले व नदीला पूर आला. तसेच शेतामध्ये जागोजागी पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

सेलू तालुक्यात दमदार पावसाने दुधना नदीला तर पूर्णा मंडळात पूर्णा नदीला पूर आल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच परभणी, पूर्णा, पाथरी व मानवत शहरात अतिवृष्टी झाल्यामुळे शहरातील काही घरामध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तसेच नदी व ओढ्याला पूर आल्यामुळे शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पिक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सेलू तालुक्यातील वालूर परिसरातील कन्हेरवाडी, सोंनां, वंलगवाडी, शेलवाडी, बोरगाव, राव्हा, बोरगाव जहागीर, आडगाव दराडे या गावात जोरदार पाऊस झाला. ऊस, कापूस, सोयाबीन ही पिके आडवी झाली. तर राव्हा येथील करपरा नदीला पूर आला होता. आडगाव दराडे येथील असलेल्या करपरा तलाव भरून वाहू लागला आहे. वालूर ते कन्हेरवाडी रास्ता हा अतिवृष्टीने वाहून गेला आहे. जिंतूर तालुक्यातील बोरी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे करपरा नदीला पूर आला होता. परभणी राज्यमार्गावरील करपरा नदीच्या पुलावरून बोरी ते चांदज दरम्यान सकाळी पाणी वाहत होते. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. तसेच पाणी परिसरातील शेतात गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या