पुण्यात पावसाच्या धुवाँधार बॅटिंगमुळे घरात शिरले पाणी, 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
छायाचित्र - चंदू पालकर

पुणे शहरातील विविध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे 50 हून अधिक घरात पाणी शिरले होते. 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. येरवडा, सिंहगड रोड, सहकारनगर परिसरात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

बुधवारी दुपारपासून सुरू असलेल्या पावसाने रात्री चांगलाच जोर धरला होता. त्यामुळे रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसामुळे दुकानांसह सोसायट्यात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. विशेषतः येरवडा, शुक्रवारी पेठ मध्यवस्तीचा काही भाग, सिंहगड रोड, दत्तवाडी, सहकारनगर आणि इतर भागातील 50 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. विविध भागात 10 झाडपडीच्या घटना घडल्या आहेत.

जोरदार पावासामुळे तळ मजले, सोसायट्या आणि रस्त्यालगत असणार्‍या दुकानांमध्ये पाणी शिरले. पाण्याचा प्रवाह इतका होता की त्यात डांबरी रस्ते उखडून गेल्यामुळे  मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. मागील वर्षी मात्र अशाचप्रकारे झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे आंबील ओढा फुटल्यानंतर अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले होते. त्यात काही रहिवाशांचा मृत्यूही झाला होता. त्याशिवाय हजारो वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदा सुदैवाने कुठेही जीवित हानी झालेली नाही, मात्र काही वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.