
मुसळधार पावसाने गुरुवारी रत्नागिरीला झोडपले. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले.
पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे सैतवडे येथील वैभव वझे यांच्या घरासमोरील विहिरीलगत असणाऱ्या पायवाटेवरून पाण्याचा प्रवाह जास्त आल्याने मोठा दगड घसरुन विहिरीलगतचे नारळाचे झाड पडल्यामुळे विहिरीचे 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मौजे विलये येथील शांताराम विलकर यांच्या घराजवळची भिंत कोसळून 56 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळवले आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 427 मिमी आणि सरासरी 47.44 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 36 मिमी, दापोली 26 मिमी, खेड 22 मिमी, गुहागर 34 मिमी, चिपळूण 36 मिमी, संगमेश्वर 49 मिमी, रत्नागिरी 31 मिमी, लांजा 50 मिमी, राजापूर 143 मिमी पावसाची नोंद झाली.

























































