
सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. सांगोला तालुक्याला याचा चांगलाच फटका बसला असून शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत आहे. असे गंभीर संकट निर्माण झाले असताना राज्यकर्ते मात्र डॉल्बीच्या तालावर गरबा खेळण्यात व्यस्त आहेत. कहर म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमासाठी खास आमंत्रित करण्यात आलं होतं.
राज्यकर्ते निष्ठूर आणि निर्दयी असतात त्याचे संतापजनक उदाहरण म्हणजे सांगोला तालुक्यात आयोजित केलेला गरबा दांडिया होय. भाजपचे नेते अन् जिल्हाध्यक्ष चेतन केदार सावंत यांनी या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रम पूर्व नियोजित होता. परंतु नैसर्गिक संकट ओढवल्याने या आपत्तीत सांगोला तालुक्यातील शेतकरी भरडला गेला. मात्र याचे भान राज्यकर्त्यांना नसल्याचे दिसून येत आहे, अशी चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना सत्तेतील जबाबदार तसेच मिसेस मुख्यमंत्र्यांची या कार्यक्रमातील हजेरी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यावरून नागरिकांकडून भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आजचा गरबा रद्द करुन जमलेले लाखो रुपये आपदग्रस्त शेतकऱ्यांना द्यायला हवे होते, असे देखील बोलले जात आहे. तालुक्यातील जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत असताना भाजपचे नेते, माजी खासदार आणि अन्य नेते डॉल्बीच्या तालावर बेधुंद होऊन नाचत असतील तर ही मंडळी माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचे आहेत का? असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
Ahilyanagar news – जामखेडला पावसानं झोडपलं; घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू, 9 जनावरं दगावली