पावसाने चिंबलेल्या कोल्हापूरला आज दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा सुरू असलेला धुमाकूळ शुक्रवारी ओसरल्याने गेल्या आठवडाभर पावसाने चिंबलेल्या कोल्हापूरकरांना घटस्थापनेच्या पुर्वसंध्येला काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत उघडेच राहिल्याने 4 हजार 256 क्युसेक विसर्ग सुरू होता. पंचगंगेच्या पाणीपातळीत सकाळ पर्यंत 6 फुटांची वाढ होऊन, दुपारनंतर 26 फुटांवर स्थिरावली होती.तर अजुनही 16 बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तासात पडलेल्या पावसाच्या नोंदी नुसार, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 74 मिमी पावसाची नोंद झाली आहे

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात वादळीवारा आणि वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. दिवसरात्र संततधार आणि रिपरिप कोसळणाऱ्या पावसाने,जनजीवन अक्षरशः विस्कळित झाले होते. शुक्रवार सकाळपासून पावसाने उघडीप घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर दुपारनंतर काही काळ उन पडल्याने, दसऱ्यानिमित्त घराघरांत स्वच्छतेच्या तयारीला वेग आला होता.