
गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पंढरपूरकरांची झोप उडाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी साठल्याने दुकान आणि घरामध्ये पाणी शिरले. वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा झाला.
पावसाळी हंगाम संपत आला तरी पंढरपूरमध्ये पावसाचा पत्ता नव्हता. मात्र गुरुवारी झालेल्या धुवांधार पावसामुळे पंढरपूरकर सुखावले आहेत तर सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना या पावसाच्या पाण्याचा फटका बसला. काल झालेल्या पावसाची नोंद 83 मिमी इतकी झालेली असून या हंगामातील ही सर्वोच्च नोंद आहे. या हंगामातील सर्व ऋतु कोरडे गेल्याने शेतकरी हवालदिल होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस खरीप आणि जनावरांच्या चाऱ्याला पोषक आहे.
दरम्यान कालच्या पावसाने कराड रोड, पुणे रोड रेल्वे ब्रिजखाली कंबरेइतके पाणी साठल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला तर संतपेठ, चौफाळा, जुनीपेठ, सांगोला नाका या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. शहरातील रस्ते नव्याने केल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पंढरपूर जलमय झाली. ही त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.






















































