
जवळपास दीड महिन्यानंतर पंढरपूर पंचक्रोशीत पावसाने दमदार हजेरी लावली. सलग दोन दिवस पडलेल्या या पावसामुळे खरीप पिकांसह उसाला जीवदान मिळाले आहे. तर, फळबागांनाही दिलासा मिळाला आहे. या हंगामातील पहिलाच मोठा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवडय़ात हलका पाऊस झाला होता. यानंतर जुलैच्या अखेरीस व ऑगस्टच्या सुरुवातीला मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला होता. या पावसाच्या भरवशावरच शेतकऱयांनी 3 हजार 820 हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. पण पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे पिके करपू लागली होती. डाळिंब, बोरी, पेरू आदी पिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता.
ऐन पावसाळ्यात विहिरी, नदी, नाले, ओढे कोरडे पडले होते. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे भीमा नदी कोरडी पडली असून, नदीवरील सर्वच बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. पंढरपूर शहराला व सांगोला तालुक्यातील 81 गावांना पाणीपुरवठा करणाऱया शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व कासेगाव पाणीपुरवठा योजनांवर पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे.
जोरदार पाऊस पडला, बंधाऱयात पाणी आले तरच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होणार आहेत. अन्यथा उजनी धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत शेतीच्या पाण्यासाठी शेतकरी संघटना आंदोलने करीत आहेत. उजनी धरणातून व नीरा कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. दरम्यान, रविवारी दुपारी तसेच रात्री दहा वाजता आलेल्या जोरदार पावसाने पिकांची तहान भागवली आहे. तर, सोमवारी दुपारी पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावले आहेत.
पंढरपूर तालुक्यातील आजचे पर्जन्यमान
z करकंब- 13 मिमी, पट. कुरोली – 18, भंडीशेगाव – 27, भाळवणी -22, कासेगाव – 63, पंढरपूर – 62, तुंगत – 33, चळे – 44, पुळूज -39, एकूण पाऊस 321 मि.मी., तर सरासरी 35.66 मि.मी. पाऊस.





























































