
हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अजूनही सिमलामध्ये अतिवृष्टी होत आहे. कांगडा,चंबा, मंडीमध्ये मूसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेशात 24 तासात 30 पेक्षा जास्त पूरस्थितीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण बेपत्ता झाले आहेत.
मंडीमध्ये घर ढासळल्याने ढिगाऱ्याखाली 7 जण दबल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत दोनजणांचे मृतदेह सापडले आहेत. कांगडामध्ये ब्रिटिशांच्या काळातील रेल्वे मार्गावरील चक्की पूल पडला आहे. चंबामधील काही भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यात 30 पेक्षा जास्त नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.
या वर्षी पावसाळ्यात एकूण 225 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण बेपत्ता झाले आहेत. राज्यात 336 मार्ग बंद आहेत. पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भाविकांनी आणि पर्यटकांनी काही दिवस हिमाचल प्रदेशात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पुढील तीन चार दिवस हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.




























































