
सामना ऑनलाईन । वर्धा
महिनाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी वर्धा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळ पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मात्र दुपार नंतर जिल्ह्यातील सलग आठ तासांपासून जिल्ह्यातील वर्धा,देवळी,पुलंगाव,आर्वी,आष्टी,कारंजा,हिंगणघाट,समुद्रपूर,गिरड भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. समुद्रपूर तालुक्यातील लाला नाला प्रकल्पाचे पाच दरवाजे 50 सेंटीमीटर ने उघडले असून धरणातून 154.72 क्युसेक्स वेगावे पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे लाला नाला नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी सकाळपासून वर्धा जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे.





























































