सोलापूर जिल्ह्यातील जड वाहतूक वाढत्या अपघातांचे मुख्य कारण, प्रशासनाचे दुर्लक्ष

सोलापूर जिल्ह्यातील महामार्ग आणि प्रमुख अंतर्गत रस्त्यांवर दिवसेंदिवस वाढणारी जड वाहतूक आता गंभीर अपघातांचे मुख्य कारण ठरू लागली आहे. ट्रक, कंटेनर, सिमेंट व वाळू वाहतूक करणारी मोठी वाहने रात्री व सकाळच्या सुमारास बेदरकारपणे धावत असल्याने मागील तीन महिन्यांत जिल्ह्यात शंभरहून अधिक अपघात घडल्याची माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांकडून मिळाली.

सोलापूर शहर पोलिसांकडून राबवले जाणारे वाहतूक नियंत्रण केवळ परगावच्या वाहनांवर केंद्रित असल्याची वाहनचालकांची तक्रार आहे. पुणे, करमाळा, धाराशीव, विजापूरकडून येणाऱ्या ट्रक आणि कंटेनर तपासणीसाठी अडकले जातात. मात्र, स्थानिक अतिक्रमण, नियमभंग किंवा ओव्हरलोड वाहने यांच्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

वाहतूक नियमांचे उल्लंघन, न तपासलेले ब्रेक, ओव्हरलोडिंग आणि थकलेल्या चालकांमुळे अनेक जीवघेणे अपघात होत आहेत. तरीही, जिल्हा वाहतूक शाखा केवळ दंडात्मक कारवाईपुरतीच मर्यादित राहिली आहे.

मागील 90 दिवसांत सोलापूर जिल्ह्यात 128 अपघात नोंदवले गेले. त्यापैकी 65 अपघातांत जड वाहनांमुळे 34 मृत्युमुखी पडले, तर 92 जण जखमी झाले. माढा, अक्कलकोट आणि पंढरपूर तालुक्यांत सर्वाधिक अपघातांची नोंद झाल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वाताकरण निर्माण झाले आहे. विशेषतः अक्कलकोट–गाणगापूर रस्ता, सोलापूर–पुणे महामार्ग आणि बार्शी–धाराशीव मार्गावरील अपघातांची संख्या सातत्याने काढत आहे.

सोलापूर जिल्हा रस्ते विकास प्रकल्पांतर्गत अनेक चौपदरी रस्त्यांची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. रस्त्यांवर कुठे खड्डे, कुठे अर्धवट उघडे डिव्हायडर आणि कुठे रात्रकालीन प्रकाशयोजना नाही. या सर्क घटकांमुळे चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होतात. तरीही संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.