
राज्यात व देशात आपल्याच पक्षाचे सरकार आह़े; मात्र या सरकारला तुमचे काहीही देणेघेणे नसून, तुमचा वैद्यनाथ कारखाना वाचविण्यासाठी आता आम्हीच आर्थिक मदत करणार, अशी भूमिका जाहीर करत तालुक्यातील शेकडो पंकजा मुंडे समर्थकांनी स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला आर्थिक मदतीचा ओघ सुरू केला आहे.
पाथर्डी तालुक्यातून जवळपास तीन ते चार कोटी रुपयांचा निधी तालुक्यातून मुंडे यांच्या कारखान्यासाठी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ कारखान्यावर 19 कोटींच्या रकमेसाठी कारवाई करण्यात आली. राज्यात व देशात सध्या भाजपचे सरकार असून, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी राज्यातील इतर कारखान्यांना मदत केली आहे. मात्र, मुंडे यांच्या कारखान्याला मदत न केल्याने सध्या मुंडे समर्थक चांगलेच संतप्त झाले आहेत.
या गदारोळात पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘स्व. गोपीनाथ मुंडे यांनी मोठय़ा कष्टातून हा कारखाना उभा केला असून, या कारखान्याच्या मदतीसाठी मी अनेक बँकांच्या हातापाया पडले; मात्र उपयोग झाला नाही. माझे वजन कमी झाले आहे, हे जाहीर केले. त्यामुळे ‘अभि नही तो कभी नहीं’ हे जाहीर करत तालुक्यातील मुंडे समर्थक गोकुळ दौन्ड, अमोल गर्जे, दत्ता बडे, नितीन गर्जे, मुकुंद गर्जे, राजेंद्र दगडखैर यांनी लाखो रुपयांच्या देणग्या मुंडे प्रतिष्ठानला देण्याचे जाहीर करत इतरांनीसुद्धा यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
पाथर्डी तालुक्यातून अनेक हात मदतीसाठी पुढे आले आहेत, तर काहींनी ‘पंकजाताई आता तरी भाजपला त्यांची जागा दाखवून द्या,’ असा सूर आळवला आहे. या संदर्भात आपणास मदत करा, असे जाहीर वक्तव्य अद्याप तरी पंकजा मुंडे यांनी केले नसले, तरीही मदतीचा ओघ मात्र सध्या तरी सुरू झालेला असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे.



























































