लेख – लेफ्ट. जन. सगत सिंग यांचे योगदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेश युद्धाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. याशिवाय 19 डिसेंबर 1961 च्या गोवा मुक्तिसंग्रामाला 61 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दोन्ही युद्धांमध्ये अत्यंत महत्त्वाची बजावलेले सैनिकी अधिकारी होते लेफ्टनंट जनरल सगत सिंग. लेफ्टनंट जनरल सगत सिंग, परम विशिष्ट सेवा पदक  (14 जुलै 1918 – 26 सप्टेंबर 2001) हे हिंदुस्थानी लष्कराचे थ्री–स्टार रँक जनरल होते. 1967 मध्ये चीनबरोबर नाथुला येथे झालेली झडप, 1961 मध्ये गोवा मुक्तीयुद्ध आणि बांगलादेश मुक्ती युद्ध यात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

जनरल सगत सिंग यांना हिंदुस्थानचे सर्वात आक्रमक जनरल आणि कधीही युद्ध न हरलेले जनरल असे मानले जाते. त्यांनी तीन मोठय़ा युद्धांत विजय मिळवला. 1961 जनरल सगत सिंग यांना ब्रिगेडियर या हुद्दय़ावर असताना 50 पॅराशूट ब्रिगेडचे कमांडर बनवण्यात आले. असे पहिल्यांदा झाले की 50 पॅराशूट ब्रिगेड नेतृत्व एका पायदळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते, मात्र पॅराट्रूपर नसल्यामुळे त्यांना पॅराट्रूपर चिन्ह (WINGS) लावता येत नव्हते. त्यांना हे माहिती होते की, जर त्यांनी विमानातून जम्प्स करून आपले पॅरा ब्रिगेडचे प्रोबेशन (परीक्षा) पूर्ण पास केले नाही तर त्यांना त्यांच्या ब्रिगेडच्या सैनिकांकडून सन्मान मिळणार नाही. म्हणून त्यांनी वयाच्या चाळीसाव्या वर्षी आकाशातून पॅरा जम्स मारून आपली पात्रता सिद्ध केली.

1961 गोवा मुक्तिसंग्राममध्ये त्यांनी 50 पॅराशूट ब्रिगेडचे नेतृत्व केले आणि एवढय़ा वेगाने लढाई गोव्याच्या राजधानीपर्यंत पोहोचली की यानंतर पोर्तुगीज सैनिकांना आत्मसमर्पण करावे लागले .

1962 गोवा मुक्तिसंग्राममध्ये त्यांच्या 50 पॅराशूट ब्रिगेड जे काम दिले होते त्यापेक्षा त्यांनी कितीतरी जास्त प्रमाणात काम केले. त्यांनी अतिशय वेगाने गोव्यात प्रवेश करून गोव्याची राजधानी पणजीच्या दिशेला कूच केले आणि तिथे असलेल्या पोर्तुगीज सैनिकांना आश्चर्यचकित केले. यामुळे वेगाने गोव्याची मुक्ती झाली. गोवा मुक्तीचे सर्वात जास्त श्रेय सगत सिंग यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत वेगाने लढाई लढलेल्या 50 पैराशूट ब्रिगेडकडे जाते.

पोर्तुगाल सरकारने जनरल सगत सिंग यांना मारण्याकरिता दहा हजार डॉलरचे इनाम त्या वेळेला जाहीर केले होते. असे इनाम लावलेले ते एकुलते एक सेनाधिकारी होते. यावरून त्यांची कामगिरी लक्षात यावी.

1967 मध्ये ते सिक्कीममध्ये नाथुला येथे हिंदुस्थानच्या 17 माऊंटन डिव्हिजनचे नेतृत्व करत होते. त्या वेळेस चीनने हिंदुस्थानच्या सीमेच्या आत चोला येथे घुसखोरी केली. अतिशय आक्रमक कारवाई करून जनरल सगत सिंग यांनी चिनी सैनिकांना तेथून हुसकावून द्यायचा आदेश दिला. पुढे झालेल्या युद्धामध्ये साडेतीनशेहून जास्त चिनी सैनिक मारले गेले. हिंदुस्थानी सैन्याला आपल्या सत्तर सैनिकांचे प्राण देऊन हे युद्ध जिंकता आले.

1962 च्या हिंदुस्थान-चीन युद्धामध्ये पराभव झाल्यानंतर पहिल्या वेळा अशाप्रकारे चिनी सैनिकांचा आपण एका लढाईमध्ये पराभव केला आणि 1962 मध्ये मिळालेले अपयश धुवून काढण्यात आले. याचे पूर्ण श्रेय जनरल सगत सिंग यांच्या आक्रमक नेतृत्वाला जाते. त्यांनी आपल्या कुठल्याही वरच्या अधिकाऱ्यांची परवानगी व हिंदुस्थान सरकारची पण परवानगी घेतलेली नव्हती आणि चीनला त्यांनी स्वतःहून निर्णय घेऊन एक मोठा धडा शिकवला. परिणाम असा झाला की, त्यानंतर 1988 पर्यंत चीनने पुन्हा आपल्या सीमेमध्ये घुसखोरी करायचे धाडस केले नव्हते.

त्यांची आक्रमक कारवाई पसंत न पडल्यामुळे हिंदुस्थान सरकारने त्यांची तिथून बदली केली, परंतु जनरल सॅम माणेकशॉ यांना सगत सिंग यांच्या सैनिकी कौशल्याची पूर्ण जाणीव होती. म्हणून त्यांनी सगत सिंग यांना ईशान्य हिंदुस्थानात दहशतवादी विरोधी अभियान याकरिता पाठवले. जिथे पुन्हा त्यांनी एक अतिशय उत्तम कारवाई केली.

1971 ची लढाई ज्या वेळेला सुरू झाली त्या वेळेला जनरल सगत सिंग हे तेजपूरमधील 4 चे कोर कमांडर होते. त्यांच्या हाताखाली तीन डिव्हिजनस होत्या आणि लढाईमध्ये त्यांना अगरतलाच्या बाजूने बांगलादेशवरती हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला.

युद्ध जिंकण्याकरिता जनरल सगत सिंग यांनी नावीन्यपूर्ण डावपेच आणि युद्धाच्या पद्धती वापरल्या. केवळ संख्याबळाच्या शक्तीवर युद्ध जिंकणे शक्य नव्हते. नैऋत्य भागात 2 कोअरने (नेतृत्व जनरल रैना) प्रथम जेस्सोर काबीज केले, नंतर खुलना बंदरापर्यंत आघाडी मारली; झेनिदावर विजय मिळवल्यानंतर पद्मा नदीवरील महत्त्वाच्या हार्ंडग ब्रिजवर ताबा केला.

वायव्य विभागात 33 कोअरने (नेतृत्व जनरल थापर) बोग्रा आणि रंगपूरमधील शत्रू सैन्याला पराजित केले. सर्वात जास्त यश हे पूर्व विभागात 4 कोअरच्या (जनरल सगत सिंग) 8, 57 आणि 23 माऊंटन डिव्हिजन्सनी मौलवीबजार, सिल्हेट, दाउदखंडी आणि मैनामनी ही शहरे जिंकून मिळवले.

जनरल सगत सिंग यांची युद्ध पद्धती अत्यंत आक्रमणशील होती. वेळेला महत्त्व होते आणि त्या दृष्टीने जनरल सगत सिंग डावपेच आखले होते. तिन्ही दिशांकडून बांगलादेशात आगेकूच करण्याचे मार्ग ताब्यात घेणे, सरहद्दीवरील पाकिस्तानी सैन्याला पिछेहाट करण्याची व डाक्का येथे एकत्रित होण्याची संधी मिळू न देणे असे डावपेच वापरले गेले.

चारही दिशांनी हल्ला करून पूर्वेमधील पाकिस्तानी सैन्याची कोंडी झाल्यानंतर पूर्व पाकिस्तानातील सेनापती लेफ्टनंट जनरल निआझी याने शरणागती पत्करली. जनरल सगत सिंग हे हिंदुस्थानी सैन्याचे कुठलीही लढाई न हरलेले एकमेव जनरल होते, परंतु त्यांच्या लष्करी योग्यतेला कधीही पूर्ण सन्मान देण्यात आला नाही. आशा करूया की आता तरी हिंदुस्थान सरकार आणि हिंदुस्थानी सैन्य या अत्यंत आक्रमक व्यक्तिमत्त्वाचे योगदान ओळखेल आणि त्यांना मरणोत्तर योग्य सन्मानाने पुरस्कृत करेल.