
सामना ऑनलाईन । पालघर
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) 2018 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पालघर जिल्ह्यातील्या एका खेडेगावातील शेतकऱ्याच्या मुलाने देदिप्यमान यश मिळवले आहे. हेमंता केशव पाटील असे या मुलाचे नाव असून त्याने UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून पाचवा, तर हिंदुस्थानातून 39 वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे हेमंतावर संपुर्ण जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पालघरच्या वाडा तालुक्यातील शिलोत्तर गावात राहणाऱ्या हेमंताचे वडील एक सामान्य शेतकरी आहेत. हेमंताने तलासरी येथील आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तर बारावीला वाड्यातील चंदावरकर कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. बारावीनंतर त्याने रायगडमधील लोणेरे येथे केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला गुजरातच्या अंकलेश्वर येथे चांगली नोकरी मिळाली. मात्र UPSC ची परीक्षा देण्यासाठी त्याने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णया घेतला. हेमंता गेल्या वर्षी UPS मध्ये 696 वा आला असून सध्या तो आयआरएसचे (महसूल सेवा) नागपूर येथे प्रशिक्षण घेत आहे. अथक परीश्रम करून व कुटुंबीयांच्या पाठींब्यामुळे त्याने चांगले यश मिळवले आहे.


























































