हेमंत सोरेन बनले झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री; शपथविधीला राहुल गांधी, ममता बॅनर्जी उपस्थित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी झारखंडचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली. राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी सोरेन यांच्यासह सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह दिग्गजांची उपस्थिती होती.

हेमंत सोरेन हे दुसर्‍यादा झारखंडचे मुख्यमंत्री बनले आहेत. 44 वर्षीय सोरेन हे झारखंडचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ठरले आहेत. मोरहाबादी मैदानात शपथविधी सोहळा पार पडला. सोरेन यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. रामेश्वर उराव, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि जनता दलाचे एकमेव आमदार सत्यानंद भोक्ता यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कम्युनिस्ट पार्टीचे सरचिटणीस डी. राजा आणि अतुल अंजान, द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार शरद यादव, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

अवघ्या चोवीस तासांत  हजारो पुस्तके भेट

सोरेन यांनी आपले अभिनंदन करणार्‍याना फुलांच्या बुकेऐवजी बुक्स म्हणजेच पुस्तके द्यावीत असे आवाहन शुक्रवारी केले होते. त्यानंतर त्यांना पुस्तके भेट देणार्‍याची रांग लागली. अवघ्या 24 तासांत त्यांच्या निवासस्थानातील एक खोली पुस्तकांनी भरून गेली. त्यात भगवद्गीतेसह शिबू सोरेन यांच्यावर आधारित ‘करिश्माई योद्धा’, ‘वीर शिबू सोरेन’ आदी पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांचे ग्रंथालय बनवले जाणार आहे.