हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतरही घ्या योग्य काळजी! वाचा सविस्तर

आपल्यापैकी सर्वांनीच कधी ना कधी कोणाला तरी हर्निया झाला आहे किंवा एखाद्याचं हर्नियाचं ऑपरेशन झाल्याचं ऐकलं असेल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं, तर आपल्या पोटातील स्नायू जेव्हा कमजोर झाल्यास हर्निया होतो. बहुतांश हर्निया पोटाशी संबंधित असतात. आपल्या पोटातील आतडी किंवा त्याचा भाग त्याच्यावरील चरबीसहित पोटाच्या स्नायूंमधून बाहेर येऊ लागतो. त्यामुळेच पोटाच्या खालच्या भागात हर्निया जास्त प्रमाणात आढळून येतात.

यावर आता लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वरदान ठरत आहेत. या शस्त्रक्रियेमुळे रूग्ण पटकन बरा होऊ शकतो. परंतु, शस्त्रक्रियेनंतरही पुन्हा हर्नियाचा त्रास होऊ नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे, असे सैफी आणि अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या बेरिअँटिक अँण्ड लँप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल भास्कर यांनी सांगितले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ‘‘हर्नियाचा त्रास असणारे अनेक रूग्ण तीव्र वेदनेच्या तक्रारी घेऊन रूग्णालयात येतात. अनेक प्रकरणात उलट्या होणं, बदधकोष्ठता आणि ओटीपोटात तीव्र वेदनासह पोटाला सूज येणं अशा समस्या दिसून येतात. हर्निया झाल्याचे लक्षात आल्यावर उशीर न करता तातडीने सर्जनचा सल्ला घेणे गरजेचे आहे. अशा स्थितीत कधी-कधी अल्ट्रासोनोग्राफी किंवा सीटी स्कॅनसारख्या तपासणी करून हर्निया आहे की नाही हे निश्चित केले जाते. कारण वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण बरा होऊ शकतो.’’

हार्नियाचे अनेक प्रकार आहेत… यातील बाह्य हार्नियाबद्दल ज आपण जाणून घेऊया…

जांघेतील हार्निया (73 टक्के)
मांडीच्या अगदी वरच्या भागात (17 टक्के)
बेंबीत (8.5 टक्के)
बेंबीच्या वरच्या मध्यमागी

काही वेळा ऑपरेशनच्या व्रणातून हार्निया होऊ शकतो.

हर्निया हा कुठल्याही वयोगटातील स्त्री व पुरूषांमध्ये होऊ शकतो. लहान मुलांमध्ये जन्मजात हर्निया सामान्य आहे. लहान मुलांमध्ये काही वेळा बेंबी फुगलेली दिसते. मूल रडत असल्यास ते जास्तच प्रकर्षांने जाणवते. बेंबीत जिथे नाळ चिकटलेली असते तिथले स्नायू कमकुवत असतात. या प्रकारच्या हर्नियात घाबरून न जाता, डॉक्टरांचा सल्ला तातडीने घ्यावा. याशिवाय तरुणांमध्ये किंवा मुलांमध्ये Indirect Inguinal Hernia प्रामुख्याने आढळतो. तर महिलांमध्ये बेंबीशी संबंधित हार्निया अधिक प्रमाणात आढळून येतो, असेही डॉ अपणाँ यांनी म्हटले आहे.

हर्नियाची लक्षणे –

पोटात सूज येणे
छातीत दुखणे
पोटाच्या वरच्या भागात वेदना
चालताना किंवा बसताना त्रास होणे

हर्नियाची कारणे –

ओटीपोटात स्नायू कमकुवत होणे आणि ओटीपोटात आत दबाव वाढणे ही हार्निया होण्यामागील दोन मुख्य कारणं आहेत. मुख्यतः लहान मुलांमध्ये डांग्या खोकला, मोठ्या माणसांमध्ये दम्याचा त्रास, धुम्रपान, अतिरिक्त चरबी, वारंवार गर्भधारणा आणि शस्त्रक्रिया यामुळेही हर्निया होऊ शकतो. याशिवाय ओटीपोटात वाढलेला दबाव, दीर्घकाळ टिकणारा खोकला, बद्धकोष्ठता, मूत्रमार्गाचा ताण आणि जड व्यायाम यामुळेही हार्निया त्रास होऊ शकतो.

हर्नियावरती शस्त्रक्रिया हाच एकमेव उपाय आहे. हर्नियाचा उपचार केवळ औषधांद्वारे केला जाऊ शकत नाही. शस्त्रक्रियेपूर्वी खोकला किंवा लघवीच्या तक्रारींसाठी उपचार घेणं गरजेचे आहे. विशेषतः सध्या हर्नियासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेला अनेक जण पसंती दर्शवित आहेत. कारण, ओपन सर्जरीपेक्षा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेचे अनेक फायदे आहेत.

दुर्बिणीच्या साहाय्याने बेंबीजवळ आणि ओटीपोटात छेद करून अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे वेदना खूप कमी होते आणि जखम पटकन भरून येते. याशिवाय रूग्णालयात जास्त काळ राहण्याची गरज पडत नाही. लवकरच रूग्ण पूर्वीप्रमाणे सामान्य आयुष्य जगू शकतो. आजकाल लँप्रोस्कोपिक तंत्राद्वारे जटील हर्निया शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जात आहेत.

शस्त्रक्रियेनंतरही रूग्णाने काळजी घेणं गरजेचं –

हर्निया शस्त्रक्रिया ही जगभरात होणारी सामान्य शस्त्रक्रिया आहे. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर रूग्ण बरा होऊ शकतो. परंत, शस्त्रक्रियेनंतर कुठलीही गुंतागुंत होऊ नये आणि कमजोर स्नायूंना भरून येण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

कारण हर्निया बरा झाल्यानंतर तो पुन्हा होऊ शकतो. अशावेळी रूग्णाला अधिक त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रूग्णाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. दिर्घकाळील खोकला असल्यास त्यावर तातडीने उपचार करून घ्यावेत.

याशिवाय शस्त्रक्रियेनंतर जोरात शिंकणं, खोकणे टाळावेत, मल-मूत्र विसर्जनसाठी जोर करू नयेत आणि शस्त्रक्रियेनंतर किमान दोन महिने जड वस्तू उचलणे टाळावेत. या बाबींची काळजी घेतल्यास हर्नियाची समस्या यशस्वीपणे हाताळता येऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या