हीरो सायकलचा चीनला ब्रेक; 900 कोटींचा करार केला रद्द

1946

गलवान खोऱ्यातील चकमक आणि लडाखमधील घुसखोरीनंतर कुरापतखोर चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तूंवर बंदी घालण्याची मागणी हिंदुस्थानात जोर धोरू लागली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांनी चीनची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. त्यापाठोपाठ खासगी क्षेत्रातील हिरो सायकल कंपनीने 900 कोटींचा करार रद्द करत चीनला चांगलाच ब्रेक लावला आहे.

हिंदुस्थान-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरात चिनी वस्तूंचा बहिष्कार करण्याची मागणी होतेय. सोशल मीडियावर याबाबतची मोहीम राबवली जात आहे. केंद्र सरकारने अलीकडेच टिकटॉकसह 59 चिनी ऍपवर बंदी घालत जोरदार धक्का दिला आहे. सरकारच्या काही विभागांनी चिनी कंपन्यांना दिलेली काही कंत्राटे रद्द केली आहेत. हिरो सायकलने एका चिनी कंपनीशी केलेला करार रद्द केला आहे. हा व्यवहार पुढील तीन महिन्यांत पूर्ण होणार होता.

लॉकडाऊनमध्येही हिरो सायकलच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यानुसार कंपनीने उत्पादनात वाढ केली आहे. लॉकडाऊनच्या काळात डबघाईस आलेल्या सायकलीचे सुटे भाग तयार करणाऱ्या छोटय़ा कंपन्यांना हिरो कंपनीत समाविष्ट होण्याची ऑफर देण्यात येत आहे. त्याचवेळी चीनसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद करून जर्मनीत नवीन प्लॅण्ट सुरू करण्याची तयारी हिरो कंपनीने चालविली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या