Hero Splendor आता ई-बाईक होणार, पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे चिंतेत पडलेल्यांसाठी खूशखबर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अधिक मायलेज देणारी बाईक म्हणून हिरो मोटर्सच्या स्प्लेंडरची खासियत आहे. देशात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या बाईकच्या यादीत या बाईकचाही समावेश होतो. सर्वसामान्यांना परवडणारी आणि देखभालीवर कमी खर्च करावा लागणारी बाईक म्हणूनही स्प्लेंडरची ख्याती आहे. ही बाईक अधिक मायलेज देणारी असली तरी ज्या वेगाने पेट्रोलचे दर वाढत चालले आहेत, ते पाहाता ही बाईक वापरणंही अनेकांना परवडेनासं होऊन बसलं आहे. ही अडचण दूर करण्यासाठी एका कंपनीने ही बाईक, ई-बाईकमध्ये परावर्तित करण्याचा मार्ग शोधून काढला आहे.

हिरो स्प्लेंडरसाठी ठाण्यातील एका कंपनीने EV Conversion Kit शोधून काढलं आहे. तुमच्याकडे असलेल्या स्प्लेंडर बाईकला तुम्ही हे किट लावून तुमची पेट्रोलवर चालणारी बाईक तुम्ही ई-बाईकमध्ये बदलू शकता. GoGoa1 नावाच्या कंपनीने हे किट शोधून काढलं असून त्याची किंमत 35 हजार रुपये असल्याचे वृत्त झी न्यूजच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे. या किटच्या वापरासाठी आरटीओने देखील मंजूरी दिली असल्याचं या बातमीत म्हटलंय.

मूळ रकमेवर जीएसटी भरावा लागेल शिवाय बॅटरीही वेगळी विकत घ्यावी लागेल. हा सगळा खर्च 95 हजाराच्या घरात जातोय. तुमच्याकडे आधीपासून स्प्लेंडर बाईक असेल तर तुम्हाला कदाचित हा खर्च परवडू शकेल, तुम्ही नवीन स्प्लेंडर घेऊन तिला हे किट बसवणार असेल तर तो तुमच्यासाठी घाट्याचा सौदा ठरू शकेल. त्यापेक्षा नवी ईबाईक घेणं हे फायदेशीर ठरू शकेल.

Ola आणि Simple One ला टक्कर देणार ‘एथर एनर्जी’ इलेक्ट्रिक स्कूटर

इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे दुचाकी खरेदीदार आता ई-स्कूटरकडे पर्याय म्हणून बघत आहेत. कार आणि दुचाकींसह इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली असल्याचे ईलेक्ट्रीक वाहनांच्या विक्री अहवालातून समोर आले आहे. एथर एनर्जी ही इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये सर्वात आघाडीची कंपनी होती. मात्र आता त्यांना टक्कर देण्यासाठी OLA इलेक्ट्रिक आणि सिंपल एनर्जी या दोन कंपन्या बाजारात उतरल्या आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी एथर एनर्जी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन येत आहे.

ओलाने इलेक्ट्रिक स्कूटरची एस 1 आणि एस 1 प्रो अशी दोन मॉडेल लाँच केली आहेत. तर सिंपल एनर्जीने सिम्पल वन ई-स्कूटर बाजारात आणण्याचं ठरवलं आहे. या स्कूटरच्या किंमती बाजारात सध्या उपलब्ध स्कूटरच्या तुलनेत जास्त आहेत. Ola आणि Simple One च्या स्कूटर्सनी एथर 450 च्या स्कूटरसमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. हिरो मोटोकॉर्प आणि सुझुकी देखील ईबाईक निर्मितीत उतरल्या असून त्यांच्या स्कूटरही लवकरच बाजारात उतरणार आहेत.

Ola आणि Simple One च्या स्कूटर्सची किंमत 1 लाखापेक्षा जास्त असल्याने एथर एनर्जीने एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणण्याचं ठरवलं आहे. या स्कूटरची किंमत कंपनी 1 लाखाहून कमी ठेवणार असल्याची चर्चा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनुदानासह या ई-स्कूटरची किंमत 80,000 रुपय ते 90,000 रुपयांच्या घरात असेल असं सांगितलं जात आहे.