माझगावमध्ये सात मजली हायटेक रुग्णालय; मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझगाव येथील महापालिकेच्या नवाब टँक दवाखान्याचा पुनर्विकास केला जाणार असून त्या जागी 7 मजली हायटेक रुग्णालय बांधण्यात येणार आहे. यात डायलिसिस, दंतोपचार, प्राथमिक आरोग्य, टीबी उपचारांसह सर्व अत्यावश्यक आरोग्य सुविधा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते नुकतेच याचे भूमिपूजन झाले. त्यामुळे हजारो रहिवाशांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवसेनेने यासाठी गेली तीन वर्षे पाठपुरावा केला होता.

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य आणि मुंबई महापालिका अहोरात्र मेहनत घेत असल्यामुळे कोरोनाची दुसरी लाटही नियंत्रणात आली आहे. आरोग्य यंत्रणा बळकट असेल तर आरोग्यविषयक कोणत्याही संकटाचा सामना करता येतो हे मुंबई महापालिकेने दाखवून दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर माझगावमधील नवाब टँक दवाखान्याच्या कोसळलेल्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार असून त्या जागी हायटेक रुग्णालय बांधण्यात येणार आहे. पूर्वी या जागेत टीबी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य पेंद्र होते. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले. यशवंत जाधव यांनी यासाठी गेली तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळे परिसरातील  रहिवाशांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. भूमिपूजना वेळी बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर, भायखळा विधानसभा समन्वयक भगत गावकर, रुग्णालय पुनर्विकास प्रकल्पाचे प्रमुख अभियंता बाबासाहेब साळवे, सी. आर. डिक्रुज, दाऊद निकाळे, निखिल जाधव, विधी विभागाचे अधिकारी गुलजर, चंदना साळुंखे, ममता पालव, बबिता पवार, शाखाप्रमुख अश्विनी, मेघा आदी उपस्थित होते. इमारतीचा आराखडा बनवणारे पालिका आर्किटेक योगेश पालकर यांचा सत्कार करण्यात आला.